आरोप
ब्रिटिशांना मदत करत असल्यानेच सावरकर चलेजाव चळवळीत सहभागी झाले नाहीत.
वस्तुस्थिती
मुळातच केवळ सावरकरच नव्हेत तर डॉ. आंबेडकर आणि इतर अनेक राष्ट्रवादी नेते या आंदोलनात सामील झाले नव्हते. मग तेही ब्रिटिशांना सामील होते असे कॉंग्रेसच्या लोकांना म्हणायचे आहे का?
‘भारत छोडो’ आंदोलन ‘भारत तोडो’ मध्ये परिवर्तित होईल हा सावरकरांचा ठाम विचार होता. काँग्रेसच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी सावरकरांनी काही अटी घातल्या होत्या. २ ऑगस्ट १९४२ ला पुण्यात झालेल्या भाषणात सावरकरांनी आपली या चळवळीची भूमिका स्पष्ट केली होती. काँग्रेसच्या संकल्पित स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची हिंदूमहासभेची सिद्धता आहे. पण त्यासाठी आमच्या तीन मागण्या आहेत.
यातील पहिली मागणी आहे – ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडावा, पण त्यांचे सैन्य मात्र मागे ठेवावे असा ठराव काँग्रेसने केला आहे. आता सैन्य ब्रिटीश असेल असेल तर आपण स्वतंत्र कसे होऊ हे काँग्रेसने समजून सांगावे!
दुसरी मागणी – स्वातंत्र्य मिळाले तर त्यामध्ये हिंदुस्थानच्या अखंडत्वाला बाधा येणार नाही असे वचन काँग्रेसनं द्यावे.
तिसरी मागणी – काहीही झाले तरी हिंदुस्थानच्या राज्यघटनेत मुसलमानांना अधिक अधिकार देण्यात येऊ नयेत. धर्म कुठलाही असेल, परंतु प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असावेत!
या तीन मागण्या काँग्रेसनं मान्य केल्या तर मागील सर्व गोष्टी विसरून, हिंदुसभा काँग्रेसच्या हातात हात घालून लढयात सहभागी होईल असेही ते म्हणाले होते, पण कॉंग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले!
यावेळी काँग्रेसची घ्येयधोरणं युद्ध सुरु झाल्यापासून कशी बदलत गेली आणि हिंदुसभेचं धोरण सुरुवातीपासून कसं राष्ट्रहिताचं आणि सुसंगत आहे हे सावरकरांनी सांगितलं.
काँग्रेस बंधूंना उद्देशून सावरकर म्हणाले “या ‘चले जाव’ चळवळीपासून देशाला कोणताही लाभ होणार नाही. त्यापेक्षा सैनिकीकरण आणि देशाचं औद्योगिकीकरण यावर भर द्यायला हवा. काँग्रेसच्या चळवळीनं स्वराज्य मिळालं तर ते आम्हाला हवंच आहे. स्वराज्य आणणार्यास आम्ही गुरु मानू. पण त्यामध्ये अल्पसंख्याकांना विशेष अधिकार असता कामा नयेत आणि देशाचं विभाजनही होता कामा नये. हे आश्वासन काँग्रेस तिच्या ठरावात देत असेल तर आम्हीही त्या स्वातंत्र्यलढयात पडेल तो त्याग करण्यास सिद्ध आहोत.”
याच भाषणात सावरकर म्हणाले, “नागरी लिपी असलेली हिंदी हि राष्ट्रभाषा काँग्रेसनं मान्य केली पाहिजे. माझ्याकडे असलेल्या निर्णयात्मक पुराव्यावरून मी असे सांगू शकतो की गांधींचे धोरण सदैव चंचल राहिले आहे आणि माझी अशी निश्चिती होऊन चुकली आहे की एकच काय पण अनेक पाकिस्ताने निर्माण करण्यास गांधी आपली संमती दिल्याखेरीज रहाणार नाहीत.”
या भाषणात पुढे ते म्हणाले की, “उपोषण करून आपल्या मागण्या मान्य करून घेता येतील ही गांधींची कल्पनाही चुकीचीच ठरणार आहे. कारण युद्धाच्या तोफा धडाडत असताना गांधींच्या उपोषणाकडे ब्रिटिश ढुंकूनही पाहणार नाहीत.”
सावरकरांनी घातलेल्या अटी देशहिताच्या असूनही काँग्रेसनं त्या मानल्या नाहीत. त्याउलट ७ ऑगस्ट १९४२ ला मुंबईत झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात मुसलमानांसाठी पूर्वीपेक्षाही अधिक अधिकार मिळतील हे घोषित केलं आणि केंद्रीय राज्यातून फुटून निघण्याचा प्रांतिक स्वयंनिर्णयाचा अधिकारही काँग्रेसनं मान्य केले.
गांधींनी जिनांना पाठवलेल्या पत्रानं काँग्रेस मुस्लीमांचं किती लांगुलचालन करत होती हे स्पष्ट होतं. गांधी जीनांना लिहितात, पूर्ण प्रामाणिकपणे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की, ब्रिटिश सरकारने सर्व हिंदुस्थानचा आपला कारभार मुस्लीम लीगच्या हाती दिला तरी काँग्रेस त्याला मुळीच आक्षेप घेणार नाही. भारतीय संस्थानांसकट सर्व हिंदुस्थानचा कारभार मुस्लीम लीगच्या स्वाधीन करण्यास काँग्रेस आडकाठी करणार नाही. लीग जे सरकार स्थापन करेल त्यात काँग्रेस अडथळा तर आणणार नाहीच पण अशा सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होईल.
८ ऑगस्ट १९४२ ला काँग्रेस महासमितीच्या संमतीनंतर गांधीजी आपला अहिंसक लढा चालू करणार होते. पण त्याच रात्री गांधीजींसकट सर्वच काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली. त्यामुळे जनता प्रक्षुब्ध झाली आणि दंगली उसळल्या. त्या शमवण्यासाठी ब्रिटिशांनी दडपशाही सुरू केली. आंदोलकांनी टपाल कार्यालयं, रेल्वे स्थानकं उध्वस्त केली. पूल उडवले, रेल्वे रूळ उखडले.
कुठल्याही नेत्याविना झालेलं हे आंदोलन हिंसकच झालं. मुसलमानांनी या लढयापासून दूर रहावं असा आदेश जीनांनी दिल्यामुळे या आंदोलनात केवळ हिंदूच सहभागी झाले. ही वस्तुस्थिती आहे.
तरीसुद्धा १० ऑगस्ट १९४२ ला सावरकरांनी काढलेल्या पत्रात गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांच्या अटकेचा आणि ब्रिटिशांनी दंगली दडपण्यासाठी केलेल्या कठोर उपाय योजनांचा तीव्र शब्दात निषेध केला.
सावरकरांचे भाकीत अक्षरश: खरे ठरले भारत छोडोचे रुपांतर पुढे भारत तोडोतच झाले. सावरकर या आंदोलनात सहभागी झाले नाहीत म्हणून आगपाखड करणारी काँग्रेस आणि गांधीजी, हिंदू संघटनांच्या राष्ट्रहिताच्या भागानगर आणि भागलपूर इथल्या आंदोलनात का सहभागी झाले नाहीत याचे उत्तर कोण देणार?